दसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार

Maharashtra Politics:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Updated: Oct 24, 2023, 01:35 PM IST
दसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार title=

Maharashtra Politics:  मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते. उबाठा सेनेचे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी 2014 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. रायगड जिल्ह्याचे ते संपर्कप्रमुखही होते.तसेच खार दांडा शाखेचे ते शाखाप्रमुख पदही काही वर्षे त्यांनी भूषवले होते. 2007 ते 2012 असे दोन टर्म ते उबाठा गटाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दसरा मेळाव्याआधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला असून यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी त्यांच्यासह उबाठा गटाचे उपशाखाप्रमुख विकास चव्हाण, गटप्रमुख विजय खरपुडे, अजय शिगवण, संतोष ठाकूर, नंदू निकम, सनी टिळेकर यांनीही देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

गेली कित्येक वर्षे पक्षासाठी पडेल ते सर्व काम जबाबदारीने पार पाडले. मात्र गेल्या काही वर्षात नेतृत्वाकडून अपेक्षित मदत मिळत नव्हती. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाले होतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे हात अधिक बळकट करण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रभागात कोळी बांधवांचे प्राबल्य असून गावठाण आणि पुनर्विकासाचे त्यांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई शहराला अधिक सुंदर आणि आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी अनेक विकासकामे सुरू असून या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. कोळी बांधवांना मासेमारी करतांना अडचण येऊ नये यासाठी कोस्टल रोड बांधणी करताना दोन खांबातील अंतर वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील कोळीवाड्यांचा सुनियोजित विकास करून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासह त्याना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 

यासोबतच वांद्रे परिसरात कोळी बांधवांना भेडसावणारे गावठाण तसेच पुनर्विकासाचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच या भागातील विकासकामे वेगाने मार्गी लागावी यासाठी निधी दिला जाईल असेही सांगितले. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल हेदेखील यावेळी उपस्थित होते.