मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेपासूनची परंपरा असलेल्या दसरा मेळावा आयोजनाची तयारी सुरु झालीय. यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षात कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे कॅबिनेट मंत्री-नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय.
मंत्रालयात पोलीस प्रशासनाशी मेळावा व्यवस्थापनाबाबत चर्चा केल्यानंतर शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात येऊन जागेची पाहाणी केली. यावेळी पक्षाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिवडीचे आमदार अजय चौधरी तसंच स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शिंदे यांनी यावेळी आयोजन व्यवस्थापणा संदर्भात काही सूचना केल्या. यंदाचा दसरा मेळावा लोकसभा निवडणुकीआधी होत असल्यानं त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय.
आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं त्यांच्या राजकीय भाषणाकडे सर्वाचं लक्ष असेल.
या मेळाव्यात ठाकरे आपल्या अयोध्यावारीच्या कार्यक्रमचीही घोषणा करणार आहेत. तसंच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेनं मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केलीय.