दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने नाव न घेता स्पष्ट अंगुलीनिर्देश करत नाराजीचा सूर व्यक्त झालाय. लोकशाहीत सध्याचा राजा कोण आहे हे तुम्ही जाणताच असं म्हणत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राजधर्माचीच जणू आठवण करून दिली आहे. भारत विकास परिषदेच्या मुंबई विभागाने काल सायंकाळी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं नाव न घेता त्यांच्या वाटचालीवर परखड भाष्य केलं.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भाष्य महत्वाचे मानलं जात आहे. राष्ट्र निर्माण में समृद्ध वर्ग की रचनात्मक भूमिका, या विषयावर भय्याजी जोशी यांचे भाषण झाले.
आपल्या भाषणात भैय्याजी जोशी म्हणाले, राजाचे काम त्याने प्रजेला सुखी ठेवावं. सुरक्षा द्यावी. मतभेद-संघर्ष होतील त्यासाठी न्यायव्यवस्था उभी करावी. शेजारी राष्ट्र यांच्याशी कसे संबंध ठेवावेत याची नीती ठरवावी. वर्तमानात राजा कोण हे आपण सर्वजण जाणता.
लोकतंत्रात सत्तेचे प्रमुख त्यालाच राजा मानतात. ही आतापर्यंतची शाश्वत गोष्ट. कधीही सत्तेद्वारे समाजात परिवर्तन येत नाही. तर ते सामाजिक व्यवस्थेने येते.
हजारो वर्षांपूर्वीपासून राजाने सामाजिक व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही. सामाजिक व्यवस्थेने राजाच्या कामात हस्तक्षेप केला नाही. परस्पर विश्वासाच्या आधारावर हे जीवन इतकी वर्षे चालत आलं आहे. पण राजाही तेव्हाच ठीक असतो जेव्हा समाज जागृत असतो. लोकतंत्रात याची निश्चित गरज आहे.
संघाने राजकारण्यांतील सत्ता लोलुपता वाढण्यावर चिंता व्यक्त केलीय. इतकंच नव्हे तर, प्रत्येक क्षेत्रात राजकारण्यांच्या हस्तक्षेपावरही संघाने नापसंती व्यक्त केली आहे. हे वक्तव्य यासाठीही महत्वाचं आहे कारण, आजच्या घडीला भाजप हा देशातला सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष आहे.
लोकशाहीत राजनेता सर्वेसर्वा बनलाय. किमान तसं मानलं जातं आहे. राजकारणी तर तसं मानतात. पण, आपणही तसं समजून चाललो आहोत हाच चिंतेचा विषय असल्याचे भय्याजी जोशी यांनी सांगितले.