मुंबई - अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदूत्त्ववादी संघटनांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेनेने अनेक प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिराचा विषय तूर्त बाजूला ठेवण्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. त्यावरूनच शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली. निवडणुकीनंतर राम मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नात सरकार टोलवाटोलवी करीत आहे, असा आरोप करून अग्रलेखात लिहिण्यात आले आहे की, 'केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणीस सुरुवात करेल असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने नेमकी हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राममंदिर हा अडचणीचा मुद्दा मोदी परिवारासाठी ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय? राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार?' असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
'राममंदिर उभारणीच्या श्रेयवादात आम्हाला पडायचे नाही. शतप्रतिशत श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा. २०१९ च्या निवडणुकांत राममंदिराचा विषय शिल्लक राहता कामा नये ही आमचीच भूमिका होती. याचा अर्थ तलवारी ‘म्यान’ करून राम मंदिराचा प्रश्न लटकवत ठेवायचा असे नाही. राममंदिराचे राजकारण निवडणुकीत नको म्हणून निवडणुकीनंतर पाहू असे संघ परिवाराचे म्हणणे आहे, पण पंचवीस-तीस वर्षे मंदिर प्रश्नाचा वापर निवडणूक मुद्दा म्हणूनच झाला म्हणून ‘आपण’ सगळे इथपर्यंत पोहोचलो. आपण शिखरावर विराजमान झालो आहोत ते राममंदिराचे राजकारण केल्यामुळेच. त्यामुळे आता राजकारण नको हा नवीन जुमला काय आहे?' असाही मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे.