आता गणिताचा अभ्यास करत बसा; शिवसेनेचा नारायण राणेंना सणसणीत टोला

उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही राणेंनी केली होती. 

Updated: Nov 26, 2019, 05:38 PM IST
आता गणिताचा अभ्यास करत बसा; शिवसेनेचा नारायण राणेंना सणसणीत टोला title=

मुंबई: भाजपने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घेतल्यानंतर शिवसेनेकडून 'ऑपरेशन देवेंद्र'मधील शिलेदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ट्विट करून राणेंना लक्ष्य केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अखेर मा. नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले. आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे, अशी खोचक टिप्पणी विनायक राऊत यांनी केली. 

नारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड'

नारायण राणे यांनी कालच महाविकासआघाडीकडे बहुमताइतके संख्याबळ नसल्याचा दावा केला होता. ग्रँड हयातमध्ये पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या ओळख परेडला १३७ आमदारच उपस्थित होते. एवढेच नव्हे तर या १३७ आमदारांमध्येही विधान परिषदेच्या अनेक आमदारांचा भरणा होता, असा दावाही राणे यांनी केला होता. तसेच उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे भाजप सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवेल, अशा वल्गनाही नारायण राणे यांनी केल्या होत्या. मात्र, नारायण राणे यांचा हा दावा सपशेल फोल ठरला. 

भाजपची सत्ता स्थापन करायचीय, कामाला लागा; फडणवीसांची राणेंवर जबाबदारी

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने पडद्यामागून अनेक हालचाली केल्या. बहुमताइतके संख्याबळ नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षातील आमदार फोडण्यासाठी विशेष रणनीती आखली होती. त्यासाठी 'ऑपरेशन लोटस' राबविण्यात येत होते. याची प्रमुख जबाबदारी नारायण राणे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील आणि बबनरावर पाचपुते या नेत्यांवर सोपवण्यात आली होती.