दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त संघर्षानंतर आता महाविकासआघाडीतील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. लॉकडाऊननंतर राज्यातील उद्योगधंद्यांना मनुष्यबळ पुरवण्याच्यादृष्टीने महाविकासआघाडी सरकारकडून ऑनलाईन रोजगार नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यासाठी दोन स्वतंत्र पोर्टल्सवर नोंदणी सुरु असल्याची बाब समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी
यापूर्वी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर रोजगार नोंदणी होत असे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात रोजगार नोंदणीसाठी उद्योग विभागाकडून स्वतंत्र पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात कौशल्य विकास विभाग राष्ट्रवादीकडे तर उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आता याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरु आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.
सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे
आज उद्योग विभागाने महाजॉब पोर्टलची सुरुवात केली.जुन्या महास्वयंम पोर्टलवर बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी नोंदणी करता येत होती. कुठे नोकर्या उपलब्ध आहेत, याची जिल्हानिहाय माहिती या पोर्टलवर मिळू शकते. तरीही नवे पोर्टल सुरु झाल्याने आता रोजगार नोंदणीसाठी येणाऱ्या तरूणांचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पोर्टल्सचे समायोजन करावे, अशी मागणी कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
तत्पूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सुप्त तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. थोड्यावेळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर जाणार आहेत. त्यावेळी हा तणाव निवळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.