गणरायाच्या साक्षीनं युतीच्या बोलणीचा श्रीगणेशा होणार?

नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, युतीकडे सगळ्यांचंच लक्ष

Updated: Sep 2, 2019, 04:45 PM IST
गणरायाच्या साक्षीनं युतीच्या बोलणीचा श्रीगणेशा होणार? title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : शिवसेना-भाजपामधली जागावाटपाची बोलणी पुढच्या १० दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनाआधी युतीच्या सूत्रावर निर्णय होणार आहे. काही जागांवर सध्या वाटाघाटी सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांत भाजपा आणि शिवसेनेने विरोधी पक्षमुक्त महाराष्ट्र असा चंग बांधल्याचंच दिसतं आहे. रविवारी भाजपाने सोलापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका आमदाराला आणि राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला गळाला लावलं. तर शिवसेनेनेही सत्तारांना गणपतीच्या मुहूर्तावर शिवबंधन बांधून घेतलं. एकीकडे ही फोडाफोडी शिवसेना आणि भाजपाकडून सुरू असतांना दोन्ही पक्षांत युती होणारच, यावर अमित शाह यांनीच शिक्कामोर्तब केलं आहे.

मुख्यमंत्री पुन्हा होणारच, असा विस्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पण युतीबद्दल उद्धव ठाकरेंनी चकार शब्द काढला नाही. 7 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मात्र तेव्हा चर्चेत असलेले संभाव्य पक्षप्रवेश होणार नसल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे. 

नारायण राणे, उदयनराजे भाजपात कधी प्रवेश करणार, छगन भुजबळ हे शिवसेनेत स्वगृही कधी परतणार या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

एकीकडे युती होण्याचे संकेत भाजपकडून दिले असतांना राणे आणि उदयनराजे यांचे भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.