मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी अगोदर आमदार होऊन दाखवावे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री व्हा किंवा मंत्री व्हा, असा टोला शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर यांनी राणे यांना लगावलाय.
सध्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री दीपक केसकर आणि नारायण राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अरुण दुधवडकर यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतलाय.
त्याचप्रमाणे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं सध्या लक्ष्मीचे वरदान आहे. म्हणून ते हव तस वागत आहेत. पण उद्या ही लक्ष्मी आमच्याकडं पण येईल हे दादानी विसरु नये, असे शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर यांनी म्हटलंय.
दरम्यान, विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा रंगू लागलीय. भाजपामध्ये प्रसाद लाड, माधव भांडारी, शायना एन सी यांच्या नावांची प्रामुख्यानं चर्चा आहे. राणे निवडणुकीत उतरले तर विरोधी पक्षांना शिवसेनेचीही साथ लाभण्याची दाट शक्यता आहे.
मात्र दुसरा उमेदवार दिल्यास त्याला शिवसेनेचा विरोध नसल्यास भाजप उमेदवाराचा सहज विजय होऊ शकतो. त्यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मात्र गेल्या विधान परिषद निवडणुकांचा अनुभन बघता ऐनवेळी भलतंच नाव पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
भाजपमध्येही सध्या हायकमांड संस्कृती असल्यामुळे इच्छुक लॉबिंग करण्यापासून दूर आहेत. विधीनपरिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होणार असून २७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अखेर दिवस आहे.