मुंबई: इंधन दरवाढीवरून काँग्रेसचे भारत बंद आंदोलन यशस्वी झाले किंवा नाही, यावरुन आता राजकीय वाद रंगला आहे. एकीकडे शिवसेनेने आम्ही सहभागी न झाल्यामुळे हे आंदोलन सपशेल फसल्याचा दावा केला. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हे आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचे सांगितले.
यासंदर्भात शिवसेनेच्या आरोपांना प्रत्यु्तर देताना चव्हाण यांनी म्हटले की, शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. विरोधकांना उशीरा जाग आली, असे सेनेचे म्हणणे आहे. मात्र, आम्हाला जाग तरी आले तुम्ही अजून झोपेतच आहात, असा टोला चव्हाण यांनी लगावला. या परिस्थितीमुळे शिवसेनेचा वाघ आता डरकाळ्या फोडत नाही तर भुंकायला लागलाय, अशी चर्चा लोकांमध्ये असल्याची तिखट टीकाही चव्हाण यांनी केली.
याशिवाय, चव्हाण यांनी इंधनाचे दर आमच्या हातात नसल्याचे दावा करणाऱ्या भाजपचाही समाचार घेतला. आमची लोकप्रियता एवढी आहे की, अशा प्रश्नांकडे लक्ष द्यायची गरज नाही, अशी भावना भाजप नेत्यांमध्ये आहे. परिणामी कर कमी करून किंवा इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दर कमी करण्याचा पर्याय मोदी सरकारकडून आजमावला जात नसल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.