शिवसेना रस्त्यावर न उतरल्यामुळे काँग्रेसचा बंद फसला- संजय राऊत

काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंदची हाक दिली.

Updated: Sep 10, 2018, 06:40 PM IST
शिवसेना रस्त्यावर न उतरल्यामुळे काँग्रेसचा बंद फसला- संजय राऊत title=

मुंबई: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे भारत बंद आंदोलन सपशेल फसल्याची टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. जमिनीवरच्या लढाईत सामर्थ्यशाली असणारी शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते, असे राऊत यांनी सांगितले. 

आम्ही या बंदला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, हा बंद खूप घाईघाईत पुकारण्यात आला होता. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे वातावरण असल्यामुळे बंदसाठी ही योग्य वेळ नव्हती. यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या असत्या. मात्र, काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंदची हाक दिली. परिणामी महाराष्ट्रात हा बंद पूर्णपणे फसला. त्या तुलनेत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रमुख राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी झाल्याने बंद यशस्वी झाला. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना रस्त्यावर न उतरल्याने ते शक्य झाले नाही, असे राऊत यांनी सांगितले. 

काँग्रेसकडून हा बंद यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, गाड्या फोडणे किंवा दगड मारणे म्हणजे बंद नाही. लोकांनी त्यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी झाले पाहिजे. हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेर पडले नसते. रेल्वे आणि वाहतुकीची इतर साधने बंद राहिली असती, असे राऊत यांनी सांगितले.