मास्टर सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरात सभा, शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू

शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार भेट 

Updated: May 14, 2022, 02:59 PM IST
मास्टर सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरात सभा, शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे आजच्या सभेत मास्क काढून बोलणार आहेत. उद्धव ठाकरे यांची तोफ आज कोणावर धडाडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

बीकेसीतली सभा भव्य दिव्य करण्यासाठी शिवसेना सज्ज झालीय. सुमारे दोन लाख शिवसैनिक या सभेला येतील, असा अंदाज आहे. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अनिल परब या सभेवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.

उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर

दरम्यान, मुंबईतल्या सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम शिवसेनेतर्फे सुरु आहे. महाराष्ट्र दौऱ्यात उद्धव ठाकरे शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
आजच्या सभेत उद्धव ठाकरे राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.  फडणवीस आणि भाजप पोलखोलवर कडाडण्याचीही शक्यता आहे. राणा दाम्पत्यावर शाब्दिक फटकारे उडतील असंही म्हटलं जात आहे. केंद्र सरकारवरही टीकेचा प्रहार करण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री वाढत्या महागाईवर ताशेरे ओढणार तसंच केंद्रीय यंत्रणांचीही पोलखोल केली जाईल आणि आगामी निवडणुकांचं रणशिंगही याच सभेत फुंकलं जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 

हिंदुत्वासह इतर अनेक मुद्यांवर मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेतीलच. पण या सभेनंतर जास्त धार येईल ती ठाकरे विरद्ध ठाकरेंच्या संघर्षाला.