आग्रही भूमिका सोडा, जनमताचा सन्मान करा; मुनगंटीवारांची शिवसेनेला पुन्हा साद

आज दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्यामुळे आमचा छोटा प्रश्नही लवकरच सुटेल

Updated: Nov 9, 2019, 08:40 PM IST
आग्रही भूमिका सोडा, जनमताचा सन्मान करा; मुनगंटीवारांची शिवसेनेला पुन्हा साद title=

मुंबई: राज्यपालांनी सर्वात मोठा म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. भाजपकडे बहुमत नसल्यामुळे ते राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने आग्रही भूमिका न घेता जनमताचा सन्मान करावा, असे त्यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले. 

मोठी बातमी: राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

आम्ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. जनतेचा कौल हा महायुतीला असून आमचे सर्वांचे मिळून १६१ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आग्रही भूमिका सोडून जनमताचा सन्मान करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. आज दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्यामुळे आता आमचा छोटा प्रश्नही लवकरच सुटेल, अशी आशा मला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये काहीजण भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत. आम्ही एकत्र येऊ नये, असे त्यांना वाटते. उद्धव ठाकरेंनी हे लोक ओळखायला पाहिजेत, असेही यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटले. 

...तर राज्यपालांनी आघाडीला सत्तास्थापनेचं आमंत्रण द्यावं - जयंत पाटील

दरम्यान, राज्यपालांकडून आलेले सत्तस्थापनेचे निमंत्रण स्वीकारायचे किंवा नाही, याचा निर्णय रविवारी मुंबईत होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल. भाजपने हे निमंत्रण नाकारल्यास राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाचारण करतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.