...तर #MeToo मोहिमेमुळे विकृती उदयाला येऊ शकते- शिवसेना

चांगले काही घडलेच नाही व येथे फक्त हैवानशाहीचेच राज्य होते असे एक चित्र निर्माण झाले आहे. 

Updated: Oct 11, 2018, 12:16 PM IST
...तर #MeToo मोहिमेमुळे विकृती उदयाला येऊ शकते- शिवसेना title=

मुंबई: #MeToo मोहीमेच्या माध्यमातून पुरूषप्रधान संस्कृती नष्ट करताना नव्या विकृतीचा उदय होणार नाही, याचे भान ठेवा असे मत शिवसेनेने मांडले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रेलाखतून याविषयीची सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे. 

विनयभंग, व्यभिचार, बलात्कार या विकृतीला समाजात स्थान असूच नये आणि त्यास कुठली कवचकुंडलेही लाभू नयेत. पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थन कुणीही करणार नाही. पण पुरुषप्रधान संस्कृती नष्ट करताना नव्या विकृत संस्कृतीचा उदय होणार असेल तर तो धोकाही रोखायला हवा. 'मी टू' चे प्रकरण हे गैरवापराचे हत्यार बनू नये, असे या अग्रलेखात म्हटले आहे. 

अधिक वाचा : लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?

सध्या देशात 'मी टू' ची वावटळ उठली आहे. वावटळीचे रूपांतर वणव्यात झाले असून नाटक, साहित्य, पत्रकारिता, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांतील दिग्गज मंडळींवर विनयभंगाचे व लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱया महिलांनी पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकरांपासून सुरू झालेले 'मी टू' प्रकरण केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यापर्यंत पोहोचले आहे व ही सर्व प्रकरणे देश-विदेशातील लोक मिटक्या मारीत चघळत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत देशाच्या साहित्य, संस्कृती, कला व राजकारणात चांगले काही घडलेच नाही व येथे फक्त हैवानशाहीचेच राज्य होते असे एक चित्र निर्माण झाले आहे. अर्थात हे चित्र बदलण्याचे काम आता या प्रकरणातील 'संशयितां'नाच करावे लागणार आहे. महिलांच्या बाबतीत होणारे गैरवर्तन हा सर्वच दृष्टिकोनातून गंभीर विषय आहे. हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असले तरी  समाजानेही महिलांबाबतचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेऊ नये, असे मत या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे.