'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 10, 2024, 08:21 PM IST
'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया title=

Shiv Sena MLA Disqualification Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची वागणूक आधीचपासून संगनमत झाल्याची दाखवणारी होती. लोकशाहीची हत्या करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का याची शंका आपण आधीच व्यक्त केली होती. राहुल नार्वेकर यांनी जाऊन आरोपीची दोनदा भेट घेतली त्याचवेळेला हा निकाल अपेक्षित होता, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंची शिवसेना (Shivsena) ही शिवसेना होऊच शकत नाही, सुप्रीम कोर्टात हा निर्णय टिकणार नससल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

आजच्या निकालामुळे एक गोष्ट स्पष्ट झालीय पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं किंवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे त्यांनी आज दाखवून दिलं. स्वत: नार्वेकरांनी दोन-तीन पक्ष बदललें आहेत. त्यामुळे त्यांच्या वाटचालीतला अडथळा त्यांनी दूर केलाय. सर्वोच्च न्यायालचाचे निर्णय हे सर्वोच्च असतात. पण नार्वेकरांनी हे पायदळी तुडवले, आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयलासुद्धा जुमानत नाही हे आजच्या निकालातून दिसून आलं आहे. 

महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी अपात्र कोणालाच केलं नाहीए. मूळ प्रकरण हे आमदार अपात्रतेचं होतं. आमची घटना तुम्ही ग्राह्य धरत नसाल तर आमच्या आमदारांना अपात्र का केलं नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  शिवसेना कोणाची हा निवडणूक आयोगाचा निकाल मुळात चुकीचा आहे आणि तोच आज विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरला. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा त्यांनी अवमान केला असून त्याविरोधात अवमान याचिका दाखल करता येते का याची आम्ही चाचपणी करणार आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

2018 ला केलेली नियुक्ती मान्य न करणं हा प्रश्नच नाहीए. आताचे गद्दार कोणत्या आधारावर निवडून आले आहेत. कोणत्या चिन्हावर निवडून आले. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. हा निर्णय आधीच ठरला होता, पण त्यांनी चालढकल करण्यात आली असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करुन शिवसेना संपवण्याचा कट आहे, पण आम्ही हे होऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे. शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना होऊच शकत नाही. कारण शिंदेंचं शिवसेनेशी नातं तुटलेलं आहे, हा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग होता असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.