मुंबई: राज्यातील शेतकरी कुटुंबियांच्या आत्महत्या आणि भुकबळींची वाढती संख्या पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकेचे कोरडे ओडले आहेत. शिक्षणाचा खर्च भागवताना वडिलांची होणारी ओडाताण पाहून एका विद्यार्थितीने नुकतीच आत्महत्या केली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. ही टीका करताना ‘माझे शिक्षण थांबल्यास माझ्या भावा-बहिणीचे शिक्षण पूर्ण होईल म्हणून मी आत्महत्या करीत आहे.’ एका शेतकऱ्याच्या मुलीचा हा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या दैनिक सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी सत्ताधारी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरादर फटकेबाजी केली आहे. 'ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे तेव्हा काही लोकांना वाटत होते व त्यांनी या ईश्वरी वरदानाचे स्वागत केले होते. त्याचप्रमाणे देशात आणि महाराष्ट्रात मोदी व फडणवीसांचे राज्य हेसुद्धा अनेकांना ईश्वरी वरदानच वाटत होते. प्रत्यक्षात आज महाराष्ट्राची स्थिती भयंकर असून सर्वत्र भूक व गरिबीचे अराजक निर्माण झाले आहे. जगणे कठीण झाले म्हणून सामान्य लोक सहकुटुंब आपली जीवनयात्रा संपविताना दिसत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात कुटुंबेच्या कुटुंबे रोज आत्महत्या करीत आहेत. विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे. नव्हे, फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात ती पडू लागली आहे, असा घणाघात उद्धव यांनी आपल्या लेखात केला आहे.
दरम्यान, 'विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे त्यासाठी अभिनंदन! पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी, गरीब, मजूर, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. त्यांचा आक्रोश आणि किंकाळय़ा नागपुरात दडपू नका. ‘ईश्वरी वरदाना’ची नरकपुरी झाली आहे. पंतप्रधान मोदी गरीबांच्या संदर्भात काही करतील या भ्रमातून आता बाहेर पडावे लागेल. देशाचा विकास दर म्हणजे ‘जीडीपी’ वाढला आहे असे एकच तुणतुणे वाजवले जाते, पण विकास दराचा असा कोणता प्रकाश पडला की, त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कुटुंबेच्या कुटुंबे रोज आत्महत्या करीत आहेत. विकास दर वाढला म्हणजे काय हे गरीबांना माहीत नाही. गरीबांचे मरण मात्र स्वस्त झाले आहे', असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आहे.