मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला गेल्या काही दिवसांत जोरदार रंगत आली आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे चित्र गेल्या तीन ते चार दिवस अधिक जाणवले. एकाच दिवसात तीन ते चार सभा दिग्गज नेते घेताना दिसत आहेत. प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला साताऱ्यात शरद पवार यांनी सभा घेतली. मात्र, अचानक पाऊस आल्याने सभा आटोपती न घेता भर पावसात शरद पवारांनी सभा घेतली आणि मार्गदर्शन केली. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावलेत. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या सभेचे फोटो सामाजिक माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यातच पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’ असे म्हटलेय. आता याचीच चर्चा होत आहे.
साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा सध्या चर्चेचा विषय झाली आहे. अध्यक्ष शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला असे असताना पवारांनी आपले भाषण न थांबवता सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या सभेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय,इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली. pic.twitter.com/yMF7kPd5qK
— Supriya Sule (@supriya_sule) October 18, 2019
सुप्रिया यांनी ट्विट करुन या सभेतील पवारांचा फोटो शेअर केला आहे. या सभेमुळे सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. साताऱ्याच्या मातीने आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेले मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होते. ‘वारे फिरलेय, इतिहास घडणार’, असे ट्विट केले आहे.
आपली जिद्द नेहमी आमच्यातील कार्यकर्ता जगवत आली #साहेब ... आज ही भर पावसात उपस्थितांना आपण संबोधित करत राहिला आणि आपल्यावर नितांत प्रेम करणारी सातारयाची जनता त्या भर पावसात आपल्या सोबत राहिली .. साहेब हीच आजची सभा इतिहास रचणार यात शंका नाही . @PawarSpeaks pic.twitter.com/7eYiKEt1UH
— Vandana Chavan (@MPVandanaChavan) October 18, 2019