पत्रानंतर खुद्द पवार शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

बैठक संपल्यानंतर पाच ते सात मिनिटं शरद पवार आणि फडणवीस यांची स्वतंत्र चर्चा

Updated: May 16, 2019, 01:35 PM IST
पत्रानंतर खुद्द पवार शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह दुष्काळ प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांची वर्षा या त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटं झालेल्या या चर्चेत दुष्काळी भागात टँकरद्वारे दिलं जाणारं गढूळ पाणी, चारा छावण्यांची अपुरी संख्या, उसाच्या चाऱ्यामुळे गुरांच्या तोंडाला होणाऱ्या जखमा, कामांअभावी होणारी स्थलांतरं, या प्रमुख मागण्यांसह इतरही बाबी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांसमोर मांडल्या. बैठक संपल्यानंतर पाच ते सात मिनिटं शरद पवार आणि फडणवीस यांची स्वतंत्र चर्चा झाली. मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही.

पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले मुद्दे

दुष्काळी भागात अनेकांना टँकरद्वारे गढूळ पाणी मिळत असून पिण्यायोग्य पाणी मिळत नाही, चारा छावण्यांचे प्रमाण वाढवण्याची गरज, उसाच्या चाऱ्यामुळे गुरांच्या तोंडात जखमा होत असल्याने दुसरा चाराही देण्याची सोय करावी आणि स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे सर्वत्र उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी, अशा प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केल्या. 

अनेक गावातील लोकांना चारा छावण्या दूर पडत असल्याने तिथपर्यंत गुरे नेणे शक्य होत नाही. शिवाय चारा छावणी चालकांना सरकारी दर परवडत नाही, असे दौऱ्यात आढळून आल्याचे पवार यांनी सांगितले. तर दुष्काळ जाहीर झालेल्या १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणतेही रेशनकार्ड असले तरी रेशन दुकानातून धान्य देण्यात येत आहे. चारा छावण्यांची संख्या वाढवली जात असून प्रति जनावर दर १० रुपयांनी वाढवून १०० रुपये देण्याचा निर्णय बुधवारी सकाळीच घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पाणी टँकरची संख्या वाढवण्यासाठी लोकसंख्येचा पूर्वीचा निकष बदलून सध्याच्या लोकसंख्येचा विचार करून पाणी पुरवण्यात येत आहे. तूर खरेदीचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तर पीक विम्याच्या ३३०० कोटी रुपयांपैंकी १३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांना दिली.