आंबेडकर चळवळीचे नेते, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी झाले. 

Updated: Jul 16, 2019, 10:57 AM IST
आंबेडकर चळवळीचे नेते, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन title=
छाया सौजन्य : फेसबूक पेज Raja Dhale (आय़ू . राजा ढाले)

मुंबई : आंबेडकरी चळवळीचे नेते आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी झाले. राजा ढाले हे बंडखोर लेखन म्हणून प्रसिद्ध होते. ते दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक आहेत. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते.

आंबेडकरी चळवळीचे नेते अशी त्यांची खास ओळख होती. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. 

विक्रोळी येथे बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा सुरु होईल आणि दादर चैत्यभूमी या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठे नुकसान झाले आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अर्पण केली आहे.

राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. तसेच ते बंडखोर लेखक म्हणून जास्त प्रसिद्ध होते. त्यांची लेखणी परखड असे. त्यांच्या परखड विचारांसाठी आणि आक्रमकतेसाठी ते प्रसिद्ध होते.