सुट्टीबाबत शाळांनी निर्णय घ्यावा- आशिष शेलार

 यासंदर्भातील निर्णय शाळांनी आपापल्या स्तरावर घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. 

Updated: Jul 27, 2019, 08:10 AM IST
सुट्टीबाबत शाळांनी निर्णय घ्यावा- आशिष शेलार  title=

मुंबई : शुक्रवार संध्याकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम वाहतूक सेवेवर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी पाणी साचून राहील्याने अनेक प्रवाशांना ट्रेनमध्येच रात्र काढावी लागली. आज सकाळपासूनही पावसाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे का ? असा प्रश्न पालकांना पडला आहे. यासंदर्भातील निर्णय शाळांनी आपापल्या स्तरावर घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. 

रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड शहरात पुराचे पाणी शिरले असून भोईघाट, सुकट गल्ली, कुंभारवाडा, मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी आणि नागरिकांची धावपळ झाली आहे. अंबा नदीला पूर आला असून जांभूळपाडा पुलांवरून पाणी वाहू लागले आहे. पावसाचा वाढता जोर पाहता वाकण ते खोपोली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

कल्याण मुरबाड रोडवर मुसळधार पावसामुळे चक्क पेट्रोल पंपावरच पाणी तुंबलेले पाहायला मिळत आहे. याठिकाणी आलेल्या सर्वच गाड्या पाण्याखाली आल्या आहेत. यामुळे जवळपास 150 लोकांनी पेट्रोल पंपाच्या गच्चीवर सहारा घेतला आहे. पाण्याची पातळी वाढतच जातानाचे चित्र पाहायला मिळत आहे. 

कल्याण कर्जत ला जाणारी रेल्वे लाईन बंद आहे तर बदलापूर वांगणी दरम्यान रुळावर पाणी साचल्याने रेल्वे बंद आहे. यामध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून एनडीआरएफचं पथक रवाना झाले आहे. या सर्व पार्श्वभुमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.