मुंबई : पावसामुळं अख्खी मुंबई बुडाली असताना आणि मुंबईकर बेहाल झालेले असताना सत्ताधाऱ्यांना मात्र त्याचं काहीच सोयरसूतक नाहीय... एकीकडं मुंबईच्या महापौरांना तुंबलेलं पाणी दिसत नाहीय. तर दुसरीकडं शिवसेना खासदार संजय राऊतांना चक्क कविता सुचतेय... 'कुछ तो चाहत रही होगी, इन बारिश की बूँदों की भी... वरना कौन गिरता है इस जमीन पर, आसमान तक पहुँचने के बाद!' शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या पावसावर ट्विटरवर पोस्ट केलेली ही कविता...
कुछ तो चाहत रही होगी
इन बारिश की बूँदों की भी,
वर्ना कौन गिरता है इस जमीन पर
आसमान तक पहुँचने के बाद !— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2019
पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये राजधानी मुंबईत २० हून अधिक बळी गेलेले असताना, कमरेएवढ्या पाण्यात मुंबईकर बुडत असताना सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांना अशा कविता सुचतायत. राऊतांनी ही कविता ट्विट करताच मुंबईकरांनी ट्विटरवरच शेलक्या शब्दांत त्यांचं थोबाड फोडलं.
कुछ तो मजबुरी रही होगी
इन मुंबई में रहनेवालों की भी,
वरना कौन चुन के देता है आपको
दरवर्षी इतका तुंबने के बाद!
ही त्यातली अशीच एक बोचरी प्रतिक्रिया...
तुंबती है मुंबई हर बार पाऊस में...
क्या चाहत रही होगी?
टक्केवारी की हाऊस... आन बाकी कायचं काय
जनाची नाही, मनाची तरी शिल्लक असेल तर मुंबईचे आजचे हाल बघून जबाबदारीने वागा....
जो आसमान मे पहुचता है, वो नीचे आता ही है
चाहे बारीश की बुंद हो, या सत्ताधारी!
एवढं तरी निर्लज्ज असू नये राव,
अशा शब्दांत मुंबईकरांनी आपला संताप व्यक्त केलाय. धक्कादायक बाब म्हणजे केवळ कविता करून संजय राऊतांची हौस फिटली नाही तर भारतापेक्षा प्रगतीशील रशियातही पूर येतात, असं बेजबाबदार वक्तव्यही त्यांनी केलं.
त्यावरून शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलं. सत्ताधारी किती गेंड्याच्या कातडीचे झालेत, याचंच हे दुर्दैवी उदाहरण...
कवी रामदास फुटाणे यांनी सत्ताधाऱ्यांच्या या असंवेदशीलतेचे वात्रटिकेतूनच वाभाडे काढले...
अधिकाऱ्यांना हप्ते देत, बिल्डरने कमावले
गोरगरीब मजुरांनी, नाहक प्राण गमावले
निष्क्रियता दिसली तरी, डोळे झाकून पहात आहेत
विरोधी पक्ष तुंबल्यामुळे, हे सैराट होऊन वहात आहेत