आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही, राऊतांचं जमात ए इस्लामी हिंदच्या व्यासपीठावर वक्तव्य

संजय राऊत यांची भाजप सरकारवर टीका

Updated: Jan 5, 2020, 12:09 PM IST
आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही, राऊतांचं जमात ए इस्लामी हिंदच्या व्यासपीठावर वक्तव्य  title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जमात ए इस्लामी हिंदच्या व्यासपीठावर जाऊन शिवसेनेची भूमिका मांडली. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. मात्र आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कायद्याची भीती हवी, पण दहशत नको, धर्माच्या नव्हे तर देशभक्तीच्या आधारावर उभं राहा, असं आवाहन त्यांनी एनआरसी विरोधी चर्चासत्रात बोलताना केलं. माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील, वरिष्ठ वकील मिहिर देसाई, युसूफ मुछालाही यावेळी उपस्थित होते.

संजय राऊत यांनी म्हटलं की, 'बाळासाहेब ठाकरे हे देशभक्त होते. पण त्यांनी कधी मुस्लिमांना निघून जा असं नाही म्हटलं. सरकारने संविधान वाचलं पाहिजे. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत ते देशभक्त नाहीत का ?

राऊत यांनी म्हटलं की, 'बाळासाहेब ठाकरे सगळीकडे जात होते. मुस्लीम समाजाचे लोकं नेहमी त्यांना भेटायला यायचे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे. अशा व्यक्तीचा मुलगा मुख्यमंत्री बनला आहे.'

'जेव्हा पोलीस जामियामध्ये दाखल झाली तेव्हा सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ही कारवाई जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे आहे. जर युवा अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे तर सरकारला माहित हवं की तो १८ वर्षाचा आहे आणि त्याला माहित आहे की योग्य -अयोग्य काय आहे.'

'आपण एकजुट होऊन देशाला वाचवलं पाहिजे. तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की, तुम्ही संख्येने कमी आहेत. तुम्ही असा विचार करा की आपण एक आहोत आणि २०२४ मध्ये आपल्याला हे दाखवावं लागेल.'