मुंबई : छात्र भारती विद्यार्थी संघटनेची विद्यार्थी परिषद आज मुंबईत होत आहे. यावेळी देशभरातील विविध संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे आणि दिल्लीचे छात्र नेते उमर खालीद एकाच मंचावर येणार असल्याची देखील चर्चा होती. पण शिवसेनेने ट्वीट करुन ही चर्चा फेटाळून लावली होती. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही छात्र परिषदेच्या कार्यक्रमासाठी चालला आहात का ? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारला. त्यावर छात्र भारतीच्या कार्यक्रमाबाबत माहिती नव्हतं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबईत आज CAA, NRC आणि NRP विरोधात छात्र परिषद आयोजित करण्यात आली आहे. या छात्र परिषदेच्या कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे. ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने रविवारी मुंबईत CAA, NRC आणि NPRविरोधी छात्र परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पूयीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, जेएनयुचे नेता रामा नागा यांच्यासह छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे उपस्थित राहाणार असून गीतकार जावेद अख्तर, वर्षा गायकवाड, आमदार कपील पाटील, आमदार रोहीत पवार यांना देखील आमंत्रित केलंय. या कार्यक्रमाच्या जाहीरातीच्या बॅनर वर आदित्य ठाकरे यांचा देखील फोटो होता. त्यामुळे आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण खुद्द आदित्य ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
आम्हाला या कार्यक्रमाची माहिती नाही आणि युवासेनाप्रमुख, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा कार्यक्रम उपस्थितीसाठी आमच्या मध्यवर्ती कार्यालयासोबत समन्वय साधावा, असं ट्विट करून आदित्य ठाकरे जाणार नसल्याचं सांगण्यात आले होते.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी खातेवाटपावर देखील भाष्य केले. जी खाती वाटप केली आहे त्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. इको पर्यटन, आरोग्य पर्यटन करण्याची इच्छा आहे. सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांचं मार्गदर्शन घेऊन काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चांगले लोक बरोबर आहे, चांगलं काम करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.