मुंबई : अयोध्या आणि शिवसेना यांचे नाते जुने आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी तेथे गेले होते. त्यानंतर कोरोना काळामुळे अयोध्येला जाऊ शकलो नव्हतो. पण, कुणी दौरा रद्द केला असला तरी आदित्य ठाकरे आणि आम्ही १५ जूनला अयोध्येत जाणार आहोत, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आम्ही काही तेथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जात नाही तर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आमची तयारी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतर पक्षाने जे काही कार्यक्रम ठरवले होते ते त्यांनी रद्द केले. ते का रद्द केले ते माहित नाही. पण, त्यांना काही सहकार्य लागले असते तर ते आम्ही नक्कीच दिले असते. अयोध्या किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. तिथे नेहमीच शिवसेनेचे स्वागत केले आहे. त्यामुळे कुणाला दर्शन घेण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास आम्ही नक्की मदत करू, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेनेचा मदत कक्ष आहे. धार्मिक लोक आहोत. त्यामुळे काशी, वाराणसी, अयोध्या येथे कसे जावे याची माहिती आम्ही देतो. त्यामुळे कुणाला काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर राजकारणाचा अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही नक्की मदत करू, असे ते म्हणाले.
अयोध्या दौरा रद्द करण्यामागे काय अडचणी आहेत ते माहित नाही. पण, भाजपने असे का करावे? भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना वापरून घेत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरं होईल. आपण वापरले जातोय हे काही लोकांना उशिरा कळतं. कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतंय, असे राऊत म्हणाले.