पोलिसांनो, मतदानादरम्यान तुमच्या कर्तव्यदक्षतेला सलाम

राज्यातील ४८ मतदारसंघात लोकसभेच्या रणसंग्रामाची सांगता झाली.

Updated: Apr 30, 2019, 08:37 PM IST
पोलिसांनो, मतदानादरम्यान तुमच्या कर्तव्यदक्षतेला सलाम title=

प्रशांत अंकुशराव, मुंबई : राज्यातील ४८ मतदारसंघात लोकसभेच्या रणसंग्रामाची सांगता झाली. चार टप्प्यात पार ही निवडणूक पार पडली. गडचिरोलीसारखा दुर्गम भाग असो किंवा मग शहरी भागातील मतदान. कर्मचाऱ्यांसाठी मतदानाची ही प्रक्रिया पार पाडणं जिकरीचं काम असतं. मतदानाचं साहित्य एक दिवस आधी मतदान केंद्रावर पोहोचतं. त्याची संपूर्ण जबाबदारी पीआरओ आणि शिपायावर असते. तसंच त्यांच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांची असते. 

रात्र जागवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बंदोबस्ताची जबाबदारी याच पोलिसांवर असते. मतदान संपल्यावर मशीन सीलबंद करून त्या स्ट्रॉग रुमपर्यंत जाईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते.यांत केवळ शारिरीक क्षमता पणाला लागत नसून मानसिक ताणही तितकाच असतो. ही सगळी प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

मुंबईतील काही मतदान केंद्रं संवेदनशील आणि अतिसंवेदनशील होती. मु्ंबईतील चाळीस हजाराहून अधिक पोलीस या निवडणूक प्रक्रियेत सामील झाले होते. पोलिसांसह सीआरपीएफ आणि होमगार्डनंही डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावलं. 

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हक्क बजावताना त्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि लोकहाही मजबूत व्हावी यासाठी पोलिसांचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच त्यांना झी २४ तासचाही सलाम.