'चीन काय किंवा पाकिस्तान काय 'मूँह में राम बगल में छुरी'

'केंद्र सरकारने पाकिस्तानच्या उलट्या बोंबा त्यांच्यात घशात घालायला हव्यात'

Updated: Jul 10, 2020, 08:29 AM IST
'चीन काय किंवा पाकिस्तान काय 'मूँह में राम बगल में छुरी' title=

मुंबई : परस्परसंबंध आणि आंतरराष्ट्रीय विश्र्वासार्हता याबाबत पाकिस्तानची प्रतिमा जगात नेहमीच वाईट राहिली आहे. तरीही कुलभूषणप्रकरणी तो देश नैकितचेचा बुरखा घालून मानभावीपणा करीत आहे. हा बुरखा केंद्र सरकारने टराटरा फाडायला हवा. त्यासाठी पाकिस्तानत्या उलट्या बोंबा त्यांच्याच घशात घालायला हव्यात, तरच कुलभूषण जाधव यांचा सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल, अशा शब्दात आज शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकीयमधून पाकिस्तानवर टीका केली आहे. 

चीन काय किंवा पाकिस्तान काय, दोन्ही देश हिंदुस्थानशी 'मूँह में राम बगल में छुरी' अशाच पद्धतीने वागत असतात. मध्यंतरी चीनने गलवान खोऱ्यात जाणीवपूर्वक तणाव वाढवला होता. आता पाकिस्तानलाही चीनप्रमाणेच हिंदुस्थानविरोधी 'उचकी' लागली आहे. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबाबत उफराटा दावा केला आहे. 

हिंदुस्थानी नौदलाची माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीचा आरोप ठेवून अटक केली आहे. त्यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास स्वतः कुलभूषण यांनीच नकार दिला, अशी नौंटकी पाकिस्तानने केली आहे.                                                                               

पाकिस्तानचे म्हणणे असे की, कुलभूषण यांना पाक सरकारने १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते., पण जाधव यांनी म्हणे तसे करण्यास नकार दिला. हिंदुस्थानने अर्थातच पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानने दबाव आणून त्यांना कसे करण्यास भाग पाडले असाही आरोप हिंदुस्थानने केला आहे.