मुंबई : Saamana editorial on BJP: शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक 'सामना'च्या रोखठोकमधून राज्यसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणुकांची साठमारी, व्यापारी तागडीवरचे राजकारण, अशा शब्दात टीका करण्यात आली आहे. दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य आल्यापासून निवडणुका महाग झाल्याची टीका करण्यात आली आहे. भाजपने विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलल्याबद्दलही 'सामना'तून टोमणे मारण्यात आलेत.
राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले. विधान परिषदाही होत आहेत. सहाव्या जागेवर भाजप जिंकला, पण तो विजय खरा आहे काय? 41 विरुद्ध 39 असा हा सामना झाला. पहिल्या पसंतीची सर्वाधिक 33 मते शिवसेना उमेदवाराने घेतली, पण विजय भाजपला मिळाला. केंद्रीय यंत्रणांनाही निवडणुकीच्या व्यापारी तराजूवर बसवण्याचे प्रकार या वेळी दिसले, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करतो हे यानिमित्ताने पुन्हा दिसले. महाराष्ट्र आणि हरियाणात ते दिसले. राज्यसभा निवडणुकांची मांडवपरतणी सुरु असतानाच त्याच मांडवात विधान परिषदेचे 11 उमेदवार उभे राहिले आहेत. मतांचे गणित हाताशी नसताना भाजपने दोन जास्त उमेदवार उभे करावे याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत आणि महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे. राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला? (विधान परिषद व्हायची आहे, पण करेक्ट कार्यक्रम सुरु झाला आहे.) यावर पैजा लागल्या आहेत.
राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक विजयी झाले हे नक्कीच, पण संपूर्ण महाराष्ट्रात विजयाची रणशिंगे फुंकावीत व महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याचा ढोल वाजवावा इतके काही घडले नाही. वसई-विरारच्या ठाकुरांनी त्यांची तीन मते सरळ भाजपच्या पारडय़ात टाकली व अन्य पाच अपक्षांना आपल्याकडे वळविण्यात फडणवीस यांना यश आले. सहावी जागा व्यापारी व बीओटी तत्त्वावर लढली गेली. दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य आल्यापासून त्यांनी निवडणुका महाग तर केल्याच, पण निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला. निवडणुका इतक्या महाग झाल्या की सामान्यांना आता निवडणुका लढण्याचा विचारही करता येत नाही. तरीही शिवसेनेने एक सामान्य कार्यकर्ता संजय पवार यास सर्व ताकदीनिशी उमेदवारी दिली व लढवले. धनशक्ती व केंद्रीय यंत्रणांपुढे त्यांना हार पत्करावी लागली, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
लाखो कोटी रुपयांचा काळा पैसा आजही आपल्या राजकीय व्यवस्थेत खेळतो आहे. हा काळा पैसा ज्या मक्तेदार भांडवलशाहीतून निर्माण झाला ती मक्तेदारी मोडून काळा पैसा संपविण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेवर आले, पण काळा पैसा आहे तसाच आहे. किंबहुना, काळा पैसा हेच भाजपचे बलस्थान बनले आहे. भाजपचे राज्य जेथे नाही तेथे ‘‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’’ म्हणून बोटे दाखवली जातात, पण प्रत्येक निवडणुकीत जे कोटय़वधी रुपये हे लोक उधळत आहेत तो पैसा कोठून आला? जिथून आला तिथे ते प्रहार कसा करतील? पैसा आणि जात-धर्म यांच्याच जोरावर निवडणुका लढवल्या जात असून आर्थिक कार्यक्रमाची कुणी चर्चाच करायला तयार नाही. ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे, असे मत 'सामना'तून मांडण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे एक उमेदवार निवडून येण्यासाठी कोटी कोटींची भाषा करतात. काल ते वेगळय़ा पक्षात होते. तेथे भरपूर पैसे कमावले व भाजपमध्ये गेले. भाजप आज अशाच लोकांचा पक्ष बनला आहे. कोणी कसेही वागो, आपण आपल्या निष्ठांप्रमाणेच वागू हा लोकशाहीचा पहिला दंडक आहे. नैतिक आचरणाप्रमाणेच लोकशाहीचे आचरण बिनशर्त असते, असेही 'सामना'त म्हटले आहे.