चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली

भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा 'सामना'तून समाचार घेण्यात आलाय.

Updated: Jun 11, 2020, 11:14 AM IST
चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेना आणि राज्यसकारबरोबरच राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार सामना संपादकीयतून घेण्यात आला आहे. बोचऱ्या शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेने हल्लाबोल केला आहे. पाटील यांना चांगले काही दिसत नाही, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे. विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करणार, असा सवालही उपस्थित केला आहे.

  निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कोकणचा दौरा केला. त्यानंतर  शरद पवारांना आताच जाग आली का, असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरुन शिवसेनेनं भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारुन स्वत:चेच पोट आणि घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा, असं म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. 

 संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही, असंही शिवसेनेनं म्हटले आहे. पश्चिम बंगालात वादळ आणि महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही? पश्चिम बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते, असा चिमटा भाजपला  शिवसेनेने काढला आहे.

महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका करत इशाराही दिला आहे.

सामना संपादकीय काय म्हटलेय?

संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणी जनतेला दिलासा देण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही रायगडचा दौरा केला. ते पुन्हा एकदा तेथे जातील असे दिसते, असे सांगत मुख्यमंत्री पुन्हा दौरा करणार आहेत, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पवारांना आता जाग आली का, असा उटपटांग सवाल पाटील यांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरुनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही, असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात.

शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत. त्यामुळे पवार कोठे गेले, किती वाजता गेले, त्यांना कधी जाग आली वगैरे नोंदी ते आता ठेवू लागले आहेत. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही.

वाजपेयींपासून आज मोदींपर्यंत प्रत्येकजण अशा प्रश्नी पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेत आले आहेत, पण पाटील व त्यांचे लोक  पवारांना आता जाग आली काय?  असे विचारून एकप्रकारे वाजपेयी-मोदींचाच अपमान करीत आहेत, असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.