Indian Railway : भारतीय रेल्वेतील खराब जेवणाचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून चिंतेचा विषय आहे. प्रवाशांच्या अनेक तक्रारी येऊनही रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे प्रत्येक उदाहरणावरुन दिसत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेसमध्ये (Mumbai Madgaon Express) घडलेल्या घटनेमुळं पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये उंदीर फिरताना आणि साठवलेल्या अन्नात घुसून ते खाताना आढळल्यानं खळबळ उडाली आहे. एका प्रवाशाने या धक्कादायक घटनेचे पुरावे व्हिडिओ शूट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केल आहे.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस 11099 या ट्रेनच्या पॅन्ट्री कारमध्ये प्रवाशांसाठी बनवलेले अन्न चाखताना आणि खाताना उंदीर आढळून आल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पॅन्ट्रीमधील हा प्रकार पाहून लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. 15 ऑक्टोबरच्या रात्री ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा सगळा धक्कादायक प्रकार त्याच्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पॅंट्री कारमधील भांड्यावर एक उंदीर बसला आहे आणि अन्न खात आहे. मग दुसरा उंदीर त्या भांड्यावर झेपावतो आणि भांड्यात तोंड घालतो आणि मग पळून जातो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, उंदीर पॅन्ट्रीच्या प्लॅटफॉर्मवर धावताना दिसत आहेत, जिथे कापलेल्या भाज्या उघड्यावर ठेवण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाची अनेक भांडी, प्लॅटफॉर्म आणि खाद्यपदार्थांची उघडी पाकिटे पॅन्ट्रीमध्ये कपाटात ठेवली होती.
मंगिरीश तेंडुलकर नावाच्या युजरने याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मंगिरिश हे 15 ऑक्टोबर रोजी कुटुंबासह रेल्वेने प्रवास करत होते. त्यादरम्यान त्याला पॅन्ट्रीमध्ये उंदीर पळताना दिसले. त्यांनी मोबाईल कॅमेऱ्याने त्यांचे रेकॉर्डिंग केले. "एक रेल्वे चाहता आणि रेल्वे प्रवासी म्हणून माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. 15 ऑक्टोबर रोजी मी माझ्या कुटुंबासह 11099 मडगाव एक्सप्रेसने प्रवास करत होतो. रेल्वेचा चाहता असल्याने ट्रेनचे इंजिन कपलिंगची प्रक्रिया रेकॉर्ड करण्याचा विचार केला, म्हणून मी ट्रेनच्या मागच्या दिशेने चालायला लागलो. इथेच मला धक्का बसला. पॅन्ट्री कार ट्रेनमध्ये मला किमान 6-7 उंदीर दिसले. मी रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. ते म्हणाले ट्रॅकखाली 400-500 उंदीर आहेत. 4-5 गाडीमध्ये घुसले तर काय अडचण आहे. मग मी असिस्टंट स्टेशन मास्तर मीना सरांकडे गेलो. त्यांनी पँट्री मॅनेजरला कळवले. मी त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला की पॅन्ट्रीमध्ये खूप उंदीर आहेत, आता आपण काय करायचे. रेल्वे नेहमीच खराब डबा पाठवते," असे मंगिरिश तेंडुलकर यांनी म्हटलं.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आयआरसीटीसीने याबाबत कारवाई केली आहे. 'या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. पॅन्ट्री कारमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी कीटक नियंत्रण वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे,' असे आयआरसीटीसीने म्हटलं आहे.