ठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान

Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठ विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याल उपस्थित नव्हते. 

कपिल राऊत | Updated: Jan 24, 2024, 04:05 PM IST
ठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान title=

Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: राज्याचं मंत्रिमंडळ अयोध्येला दर्शनाला कधी जाणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळताना दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात 5 फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे 5 फेब्रुवारीला अयोध्येत रामलल्लाचं (Lord Ram) दर्शन घेणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय  यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळही दर्शन करणार आहे.. 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी राज्यातून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री गेले नव्हते.. मात्र आता अयोध्या दौऱ्याचा प्लॅन भाजपने (BJP) तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

म्हणून शिंदे अयोध्येत गेले नाहीत
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्टा करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यात देशभरातील राजकीय, उद्योग, कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मात्र जाऊ शकले नाहीत. याचं कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं. 'देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसxच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकांऊटवरुन दिली होती.

ढोल वाजवून सोहळा साजरा
अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सहकाऱ्यांसोबत एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय श्रीरामचा जयघोष केला. त्यानंतर ढोल वाजवून शिंदेंनी शिवसैनिकांसोबत आपला आनंद साजरा केला. तर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरातल्या रामनगर इथल्या राममंदीर परिसरातून अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहीला. 

भाजपने बनवला प्लान
भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. 31 जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह संपूर्ण मंत्रिमंडळ 1 फेब्रुवारीला श्रीरामाचं दर्शन करणार आहेत. तर 5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अयोध्येत पोहोचेल. अरुणाचलचे मुख्यमंत्री 6 फेब्रुवारीला मंत्रीमंडळासह दर्शन घेतील.  तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं मंत्रिमंडळ 9 फेब्रुवारीला अयोध्यावारी करतील. 12 फेब्रुवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचं मंत्रीमंडळ तर 15 फेब्रुवारीला गोवा सरकारचं मंत्रीमंडळ अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतील. 

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिश्वा 22 फेब्रुवारीला तर 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, 4 मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव मंत्रिमंडळासह प्रभू रामाचं दर्शन घेतील.

भाविकांची तुफान गर्दी
रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत सलग दुसऱ्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी दिसतेय. मंदिर उघडण्याआधीच कडाक्याच्या थंडीत भाविकांनी रात्रीपासूनच लांबच लांब रांग लावलीय. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय. त्यामुळे अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी दिसतेय.. मात्र दर्शनासाठी पुरुषांची आणि महिलांची रांग वेगळी करण्यात आलीय. मंगळवारी अडीच ते तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात आलंय..