मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे. मराठी भाषा गौरव दिनाचा मुहूर्त साधून अमित ठाकरेंकडे मनसेने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा सेनेची जबाबदारी होती.
गेल्या काही काळापासून अमित ठाकरे हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी नाशिकचा दौराही केला होता.
नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची धुराही अमित ठाकरे यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच अमित ठाकरे अलीकडे मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
पक्षाच्या अनेक शाखांमध्ये जाऊन त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. अमित ठाकरे यांच्याभोवती असलेल्या वलयामुळे ते सातत्याने चर्चेचा विषयही असतात.
अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रुपाने अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे.
मनसेने अधिकृत परिपत्रक काढून ही महिती दिली आहे. तसेच त्यांचे अभिनंदन देखील केले आहे. दरम्यान आगामी महापालिकेच्या निवडणुकींच्या दृष्टीने अमित ठाकरे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.