शिवसेनेनं घेतला राज ठाकरेंचा धसका ? मुंबई, ठाण्यात सत्तेचं गणित बिघडणार?

महापालिका निवडणुकीत मनसे शिवसेनेचं मतांचं गणित बिघडवणार...

Updated: Apr 20, 2022, 10:27 PM IST
शिवसेनेनं घेतला राज ठाकरेंचा धसका ? मुंबई, ठाण्यात सत्तेचं गणित बिघडणार?  title=

मुंबई : मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा मोठा केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यामुळे शिवसेनेसमोरची आव्हानं वाढली आहेत. यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचं गणित बिघडतं की काय, अशी स्थिती निर्माण झालीये का? 

मुंबईसह ठाणे, पुणे, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांवर परिणाम होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या सेक्युलर पक्षांसोबत सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेचे काही मतदार नाराज असण्याची शक्यता आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरेंची हिंदूत्वाची खेळी शिवसेनेला अडचणीची ठरण्याची चिन्ह आहेत.  

मनसेमुळे शिवसेनेच्या अनेक सीट धोक्यात?

प्रखर हिंदुत्वाच्या मुद्दयावर राज ठाकरेंच्या मनसेला किती जागा मिळणार हे आताच सांगता येणं कठीण आहे. मात्र महापालिका निवडणुकीत मतांचा फरक फार कमी असतो. मनसे उमेदवारांनी अनेक जागांवर 100 ते 1000 मतं घेतली तरी शिवसेनेचं महापालिकेतील सत्तेचं गणित बिघडू शकतं. कारण याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. 

गेली 25 वर्षं मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला घाम फोडला होता. 

2017 च्या निवडणुकीत 227 सदस्य असलेल्या सभागृहात शिवसेनेचे 91 सदस्य निवडून आले होते. तर भाजपनं 80 जागा जिंकत मुसंडी मारली. काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 8 आणि समाजवादी पार्टीचे 6 नगरसेवक निवडून आले. अपक्ष आणि अन्य पक्षांना 6 जागा मिळाल्या. यावेळी मनसेचे 7 जण निवडून आले होते. मात्र त्यातील 6 जण नंतर शिवसेनेत गेले. 

देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा नवा नाही. भाजप-शिवसेनेनं अनेक वर्षं याच मुद्द्यावर राजकारण केलं. मात्र मनसेनं हा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न करू शिवसेनेला धक्का देण्याची तयारी केलीये. आता शिवसेना आपले महापालिकेचे गड शाबूत ठेवण्यासाठी मनसेला कसं रोखणार याकडे लक्ष लागलं आहे.