मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस आह. सर्वपक्षीय नेत्यांची प्रचारासाठी लगबग सुरु आहे. आज राज्यात प्रचारसभांचा धडाका आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असेल. पण आज प्रचारावर पावसाची टांगती तलवार आहे. काल अनेक भागात पावसामुळे प्रचारकांची चांगलीच धावपळ झाली होती. यामुळे अनेकांच्या प्रचारसभा रद्द झाल्या होत्या. तर अनेकांना प्रचार थांबवावा लागला होता.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी संध्याकाळी अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली.
अनेक बडे नेते प्रचारसाठी मैदानात आहेत. जास्तीत जास्त सभा घेण्याचा आज नेत्यांचा मानस आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या आज नवापूर, अकोले आणि कर्जत जामखेडमध्ये सभा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भात प्रचार करणार असून सकाळी नागपुरात पदयात्रा काढणार आहेत. पाटणसावंगी, भंडारा, चंद्रपूरच्या चिमूर आणि सावलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत.
नितीन गडकरी विदर्भात चार सभा घेत आहेत. नागपूरच्या रामटेक, काटोलमध्ये, नागपूर दक्षिणमध्ये तसंच वर्ध्याच्या आर्वीत प्रचार करणा आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज मुंबई आणि उपनगरात सभा आहेत. मालाड पश्चिमेत तसंच कल्याण पूर्वमध्ये त्यांची सभा होणार आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील प्रचारात आहेत. उल्हासनगर, अमळनेर, चाळीसगाव, यवतमाळमध्ये सभा होणारेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज साताऱ्यातल्या माणमध्ये तसंच महाड, श्रीवर्धन, उरण, कर्जतमध्ये शेवटच्या दिवशी सभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भोर, अहमदनगर, इंदापूर, बारामतीत सभा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर विदर्भात असून काटोल, अर्जुना आणि गोंदिया तसंच देगलुरमध्ये सभा होणार आहेत.