लोकलमध्ये धक्का लागून खाली पडलेल्या प्रवाशांविषयी हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायालयाने लोकलने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारं निरिक्षण नोंदवलं आहे. 

Updated: Apr 26, 2022, 07:31 PM IST
लोकलमध्ये धक्का लागून खाली पडलेल्या प्रवाशांविषयी हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  लोकल रेल्वे म्हणजे मुंबई आणि शहराच्या आसपास राहणाऱ्यांसाठी लाईफलाईन. लोकलमधून प्रवास करताना गर्दीचा सामना करावाच लागतो. आता न्यायालयाने लोकलने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारं निरिक्षण नोंदवलं आहे. (railways should pay compensation if a person falls and gets injured in a crowded train mumbai high court)
 
लोकलमध्ये नेहमी गर्दी असतेच. रेल्वेत चढताना तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळेस रेल्वेत चढताना सहप्रवसाचा धक्का लागून दुखापत होते. अशा दुखापतग्रस्त प्रवाशाला रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या बाबतचा मोठा आणि महत्त्त्वाचा निर्णय दिला. एका प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले.

तसेच या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ट्रेनमधून पडून गंभीर जखमी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीला 3 लाख हजार लाख रुपये देण्याचे आदेश पश्चिम रेल्वेला दिले आहेत. 

नक्की प्रकरण काय? 

नितीन हुंडीवाला हे विक्रोळीत राहतात. ते 23 जानेवारी 2011 ला दादर स्टेशनवरून विरारसाठी निघाले होते. या दरम्यान गर्दीने भरलेल्या विरारला जाणार्‍या ट्रेनमध्ये ते चढले. दुर्दैवाने ते चालत्या ट्रेनमधून खाली पडले. यामध्ये त्यांना डोक्याला आणि डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. यात त्यांना अपंगत्व आले.  

हुंडीवाला यांनी या प्रकरणी रेल्वेवर दावा ठोकत 4 लाख रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र हुंडीवाला यांचे धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढणे हे अविवेकी आणि गुन्हेगारी कृत्य होते, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला.

न्यायालयाने काय म्हटलं?

जर एखाद्या प्रवाशाने गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर प्रवाशांनी त्याला धक्का दिल्याने तो पडला आणि त्यामुळे दुखापत झाली, तर अशा व्यक्तीला रेल्वेविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करण्यास पात्र असेल असा आदेश हाय कोर्टने दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हे आदेश दिले. 

"तसेच गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये चढणे गुन्हेगारी कृत्य होऊ शकत नाही.  मुंबईत गर्दी खूप असल्याने प्रत्येक मुंबईकराला जोखीम घेऊन गर्दीत लोकल पकडावी लागते", असं निरीक्षण हे न्यायालयाने नोंदवलं. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वसामन्य लोकलकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.