मुंबई : भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात लगावण्याचं कथित वक्तव्य केल्यानंतर, राज्यातील काही शहरांमध्ये भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरांमध्ये भाजपा कार्यालयांवर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. याच दरम्यान भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोस्टरवार सुरु झालं आहे.
नारायण राणे यांचा फोटो लावून त्या बाजूला मोठ्या अक्षरात कोंबडी चोर असं लिहिण्यात आलं आहे. खाली शिवसेनेचं चिन्ह आणि अमेय अरुण घोले, नगरसेवक, युवासेना कोषाध्यक्ष असं लिहिण्यात आलं आहे.
तर उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून त्या बाजूला घर कोंबडा असं लिहिण्यात आलं आहे. त्या बाजूला भाजपाचं कमळाचं चिन्ह आहे, संकेत बावकर, राणे समर्थक असं लिहिण्यात आलं आहे. हा फोटो नितेश राणे यांनी ट्ववीट करून ही बॅनर्स कुणी काढली असं लिहिलं आहे.
भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर चांगलीच जुंपली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे, तसेच मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलताना संयम बाळगला पाहिजे, तसेच ही तोडफोड ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.