पीएमसी बँक निर्बंधांचा फटका सामान्य ग्राहकांप्रमाणेच व्यवसायिकांना

पीएमसी बँकेवरील निर्बंधांचा फटका सामान्य ग्राहकांप्रमाणेच कंपन्यांनाही.

Updated: Oct 1, 2019, 10:56 PM IST
पीएमसी बँक निर्बंधांचा फटका सामान्य ग्राहकांप्रमाणेच व्यवसायिकांना title=
संग्रहित छाया

मुंबई : पीएमसी बँकेवरील निर्बंधांचा फटका सामान्य ग्राहकांप्रमाणेच कंपन्यांनाही बसत आहे. मुंबईतील भांडुपचे शेखर परब यांनी वर्षभरापूर्वी ऑनलाइन मेडिकल व्यवसाय सुरू केला होता. त्यांचे पीएमसी बँकेमध्ये चालू खाते आहे. याच खात्यातून त्यांचे व्यवहार होत होते. मात्र बँकेवर निर्बंध आल्यामुळे त्यांचे पैसे अकडून पडलेत. त्यामुळे व्यवसायासाठी पैसा कसा उभा करायचा याची चिंता परब यांना सतवत आहे. बँक बुडल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, डीलरची देणी रखडल्यानं व्यवसायाला अखेरची घरघर लागलीये. 

खातेधारकांचे ठिकठिकाणी आंदोलन

पीएमसी बँकेवर रिजर्व बँकेनं आर्थिक निर्बंध लादल्यामुळे लाखो ग्राहकांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यामुळे बँकेचे खातेधारक ठिकठिकाणी आंदोलनं करून आपला रोष व्यक्त करतायत. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रिझर्व्ह बँकेसमोर आज शेकडो खातेधारकांनी निदर्शनं केली. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपमदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी खातेधारकांसह रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही याबाबत अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरे दिली नसल्याचा आरोप निरुपम यांनी केला. 

बॅंक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणातपीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक  चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणूक करणे कट रचणे असे काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकारी यांचा समावेश आहे.