मुंबईत 67 वर्षीय अपंग नागरिकाला गंडा, आयुष्यभराची लाखोंची कमाई गमावली; तुम्ही कधीच करु नका 'ही' एक चूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन केला होता. तिने शेअर सर्टिफिकेट तसंच बँकेचं पासबूक अशी खोटी कागदपत्रंही दाखवली होती.   

शिवराज यादव | Updated: Mar 6, 2024, 04:49 PM IST
मुंबईत 67 वर्षीय अपंग नागरिकाला गंडा, आयुष्यभराची लाखोंची कमाई गमावली; तुम्ही कधीच करु नका 'ही' एक चूक title=
(प्रातिनिधिक फोटो)

मुंबईत एका 67 वर्षीय अपंग नागरिकाला गंडा घालण्यात आला आहे. एका महिलेने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्याची तब्बल 96 लाखांची फसवणूक केली आहे. पीडित व्यक्तीने याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन केला होता. तिने बनावट शेअर सर्टिफिकेट तसंच बँकेच्या पासबुकवरील नोंदी दाखवल्या होत्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती लालबागमध्ये आपल्या 31 वर्षीय मुलासह वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नीचं 10 वर्षांपूर्वी निधन झालं असून, मुलगाही अपंगत्वाने त्रस्त आहे. त्याला शेल्टर होममध्ये हलवण्यात आलं असून शारीरिकदृष्ट्या अपंग असलेला ज्येष्ठ नागरिकही आश्रमात राहतो.

पोलिसांनी सांगितलं आहे की, 67 वर्षीय नागरिक सरकारी कर्मचारी होती. निवृत्तीवेतनातून तो महिन्याला 30 हजार रुपये कमवत होता. ज्याने नागरिकाची फसवणूक केली आहे, ती त्याची दूरची नातेवाईक आहे. 

"14 नोव्हेंबर 2016 रोजी तक्रारदाराची एका वाढदिवसाच्या पार्टीत संशयिताशी भेट झाली. तिने आपली ओळख आरबीआयची कर्मचारी म्हणून करुन दिली होती. तिने त्यावेळी पीडित व्यक्तीला आरबीआयच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसंच गुंतवणुक केल्यास प्रत्येक तिमाहीत 2 लाख रुपये व्याज मिळेल असा दावा केला," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

2017 मध्ये संशयित महिला जेव्हा लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी पोहोचली तेव्हा पुन्हा एकदा गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीडित संशयित महिला आणि अन्य एका नातेवाईकासह काळाचौकी येथील एका बँकेत गुंतवणूक योजनेची चौकशी करण्यासाठी गेले होते.

"खात्री पटल्याने तक्रारदाराने तात्काळ आरटीजीएसच्या माध्यमातून 22 लाख रुपये महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर केले. महिला भावनात्मक पाठिंबा देत असल्याने तक्रारदार तिच्यावर आंधळा विश्वास ठेवत होता आणि आपल्या सर्व गुंतवणूकीची माहिती दिली होती," असं पोलिसांनी सांगितलं आहे.

महिला तक्रारदाराला आश्रमात भेटायला जात असे. यानंतर तिथून त्याला बँकेत घेऊन जायची आणि आपल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करायला लावायची. हे पैसे आरबीआयमध्ये गुंतवणुकीसाठी आहेत असं ती त्याला सांगत असे. आपला दावा सिद्ध कऱण्यासाठी ती शेअर सर्टिफिकेट, पासबूक अशी खोटी कागपत्रंही दाखवत होती.

पण ज्येष्ठ नागरिकांनी बँकेतील अधिकाऱ्यांकडे व्याजाच्या रकमेसंबंधी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचं उघड झालं. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.