Barfiwala Flyover-Gokhale Bridge Connection: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल अखेर अनेक महिन्यांनी सुरू झाला. मात्र, पुल जरी सुरू झाला असला तरी नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. अंधेरी पश्चिम दिशेला असलेल्या सी डी बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी नवीन बांधकामामुळं वरखाली झाली आहे. त्यामुळं या पुलावरुन प्रवास करणे शक्य नाही तसंच, अपघात होण्याचीही शक्यता आहे.
गोखले पूल जुन्या सी.डी बर्फीवाला पुलाला जोडणे शक्य नाही. कठिण उतार दिल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने म्हटलं आहे. बर्फीवाला पूल आणि नवीन गोखले पूल यामध्ये सुमारे दीड मीटर उंचीचे अंतर आहे. पुल जोडण्यासाठी या दोघांमध्ये उतार बांधल्यास तो कठीण उतार असेल व त्यामुळं अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रश्नावर पालिकेने तोडगा काढला आहे.
पूल जोडण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू असून पुढील धोके टाळण्यासाठी गोखले पुलाच्या दिशेने असलेला बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडण्याचे नियोजन असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानंतर बर्फीवाला पूल पुन्हा गोखले पुलाला जोडला जाईल. या कामासाठी साधारण 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. पण हे काम सुरू करण्याआधी व्हिजेआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्ग येथे दुरूस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नियोजित केल्याप्रमाणे दुसर्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल.
गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यात बर्फीवाला पुलाच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील काम आणि दोन्ही पुलाच्या जोडणीचे काम डिसेंबर 2024मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबईतल्या अंधेरी येथील पूर्व - पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.याच पुलाला जोडणाऱ्या बर्फिवाला पुलाची एक मार्गिका मात्र उंची कमी जास्त झाल्याने जोडल्या गेली नाही.त्यामुळे या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकली नाही. रेल्वेच्या सूचनेनुसार रेल्वे पुलाची उंची जास्त करण्यात आल्याने ही समस्या उद्भवली आहे आता पालिका हे दोन्ही पूल एकत्रित करण्याचं काम करत आहे.