मुंबईच्या रस्त्यावर मोरांची सैर

लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांना सुखद अनुभव

Updated: Apr 1, 2020, 10:40 PM IST

मुंबई : कोरोनामुळे मुंबई थांबलीय. गाड्यांची वाहतूक नसल्यानं गजबजलेले रस्ते मोकळे झालेत. लोक घराबाहेर पडत नसल्यामुळे मुंबईतल्या काही भागात निरव शांतता आहे. अशा वातावरणात मुंबईचं मूळ नैसर्गिक रुप काही ठिकाणी अनुभवायला मिळतंय. असाच एक सुखद अनुभव दक्षिण मुंबईत मलबार हिल, केम्स कॉर्नरच्या नागरिकांनी घेतला. त्यांना थेट मोरांचं दर्शन झालं. एवढंच नाही तर मोरांचा फुललेला पिसाराही पाहता आला....

सात बेटांची मुंबई आता पुस्तकात वाचायला मिळते. उंच टोलेजंग इमारती, सगळीकडे लोकांचा कोलाहल, दिवसरात्र रस्त्यावर धावणारी वाहनं, वाहनांच्या हॉर्नचे कर्णकर्कश आवाज, मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, यामुळे मुंबईत अनेक पशुपक्षांचा आवाज आणि अस्तित्व नसल्यासारखं झालं होतं. पण कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि मुंबईतला गजबजाट थांबला. त्यामुळे मुंबईतल्या लुप्त झालेल्या निसर्गाचं अस्तित्व पुन्हा डोकावू लागलं. मुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिनचं दर्शन असो किंवा झाडांवर पक्षांचा किलबिलाट.... जगाबरोबर बदलताना हरवलेल्या मुंबईच्या काही छटा मुंबईकरांना लॉकडाऊनच्या काळात अनुभवता येत आहेत.

मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात आजही वेगवेगळ्या पशुपक्षांचं अस्तित्व कायम आहे. राजभवनाच्या विस्तीर्ण परिसरात मोरांचा वावरही असतो. पण सामान्य मुंबईकरांना तो कधी अनुभवता येत नाही. पण मुंबईचे रस्ते मोकळे झाले असल्यानं आणि नेहमीचा कोलाहल नसल्यानं मोरांनीही राजभवन सोडून आजूबाजुच्या परिसरात भटकंती केली.

मलबारहिल, केम्स कॉर्नर परिसरात मोर फिरू लागले आणि तिथल्या नागरिकांनाही पक्षांच्या डौलदार राजाचं दर्शन झालं. मोकळ्या रस्त्यावरून फिरताना मोर कधी गाड्यांवर बसले, कधी रस्ता सोडून इमारतीच्या कुंपणात शिरले, मनसोक्त फिरले आणि त्यांनी मुंबईकरांची निराशाही केली नाही. काही ठिकाणी त्यांनी चक्क पिसारा फुलवून आपल्या ऐटबाज रुपाचं दर्शनही घडवलं.

कोरोनाच्या संकटामुळे रोज हजारो कोटींची उलाढाल करणारी मुंबई शांत झाल्यानं मोठा आर्थिक फटका बसला आहे. पण काळाबरोबर धावणारी मुंबई या काळात मोकळा श्वास घेऊ लागलीय. मुंबईच्या रस्त्यावर मोरांची सैर हे त्याचंच दर्शन आहे.