पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर

पंकजा मुंडेंची सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका

Updated: Nov 3, 2019, 01:23 PM IST
पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. काढणीच्या वेळी आलेल्या अवेळी पावसाने  शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पिक वाया गेलं आहे. या संकटाने बळीराजा पुरता कोलमडला आहे. शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसानभरापाई देण्याची मागणी होत असतानाच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, बँक-अधिकाऱ्यांना कडक सूचना आणि लोकांच्या रांगा, अस्वस्थता शांत करण्यासाठी आश्वस्त करणारे शब्द आवश्यक असल्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमधून केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची तरदूर करण्याचे सांगितलं आहे. सर्व विमा कंपन्यांनाही लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान झालेल्या भागांचं तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करावे. स्थानिक गावकर्‍यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

  

राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली असून, त्यामध्ये ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यांचा समावेश आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी रकमेची तरदूत केली असली तरी, आता परतीच्या पावसात उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.