ऐकलंत का... मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार

मुंबई आणि पुण्यातील अनेकांनी गावी जायची तयारी सुरु केली होती. 

Updated: May 3, 2020, 08:11 AM IST
ऐकलंत का... मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार title=

मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी परतण्यासाठी आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिली होती. तसेच परराज्यात अडकलेल्या मजुरांसाठी विेशेष रेल्वेसेवा सुरु झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील अनेक लोकांनी गावी जायची तयारी सुरु केली होती.  विशेषत: कोकणवासियांनी आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनचे बुकिंग करण्यासाठी अर्जही भरले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या एका खुलाशामुळे या लोकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 

मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच बाहेर सोडले जाईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी ज्या शहरांमध्ये पोलीस आयुक्तालये आहेत त्या शहरांमध्ये जिल्ह्याच्या बाहेर किंवा राज्याच्या बाहेर जाण्याच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार होते. परंतु, यामधील पुणे आणि मुंबई शहराबाबतचे निर्देश लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचले नव्हते.

त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील अनेकांनी गावी जायची तयारी सुरु केली होती. अनेकांनी परवानगीसाठीचे ऑनलाईन अर्जही भरायला घेतले होते. मात्र, मुंबई आणि पुणे शहराबाबत विशेष निर्बंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांच्या गावी जाण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.

दरम्यान, मुंबई आणि पुण्यात अडकून पडलेल्या मजुरांना परवानगीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागाच्या पोलिस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील करोना प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी असा भरा ऑनलाईन अर्ज

शनिवारी मध्यरात्रीच भिवंडी रेल्वे स्थानकावरून गोरखपूरकडे विशेष ट्रेन रवाना झाली. या ट्रेनमध्ये ११०४ मजूर होते. तत्पूर्वी नाशिकमधूनही उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. या गाडीत ८४५ मजूर होते. तर शुक्रवारी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशसाठी पहिली रेल्वे सोडण्यात आली होती.