Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) चांगलेच आक्रमक झाले आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) जाहिराती प्रकरणात इशारा दिल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केलं आहे. बच्चू कडू त्यांच्या कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर जमले होते. याप्रकरणी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवण्याचीही घोषणा बच्चू कडू यांनी केली होती. सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी याधी दिला होता.
काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं होतं. सचिन तेंडुलकरच्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरावरुन बच्चू कडू हे बऱ्याच दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सचिन तेंडुलकरने भारतरत्न पुरस्कार परत करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यानंतर आक्रमक होत बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील बंगल्याबाहेर आंदोलन केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जर सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न नसता तर आम्ही आंदोलन केलं नसतं असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
सचिनने ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा इशारा दिल्यानंतर बच्चू कडू कार्यकर्त्यांसह त्याच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले होते. बच्चू कडूंनी यापूर्वी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. मात्र काही वेळातच पोलिसांनी बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
सचिन तेंडुलरकने काही दिवसांपूर्वी एका ऑनलाईन गेमची जाहीरात केली होती. या जाहिरातीवर बच्चू कडू यांना आक्षेप घेतला होता. बच्चू कडू यांच्यामते या जाहीरातीमध्ये अप्रत्यक्षपणे जुगाराचे समर्थन करण्यात आले आहे. त्यामुळे सचिनने अशा प्रकारच्या जाहीराती करू नये आणि माफी मागावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. यासोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही याबाबत भाष्य केलं होतं. "पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटपटू असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. तेव्हा या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातली जनता बळी पडत असून अनेकांचं कौटुंबिक आयुष्य देखील उद्ध्वस्त होत आहे," असे बच्चू कडू यांनी पत्रात म्हटलं होतं.