INDIA Alliance Meeting In Mumbai: विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची बैठक आज (31 ऑगस्ट) आणि उद्या (1 सप्टेंबर) मुंबईमध्ये होत आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 28 पक्षांचे नेते एकत्र येणार आहे. पाटणा, बंगळुरुनंतर I.N.D.I.A आघाडीची ही तिसरी बैठक आहे. I.N.D.I.A आघाडीची पहिली बैठक जून महिन्यात पाटण्यात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात बंगळुरुमध्ये दुसरी बैठक झाली. आता मुंबईमध्ये होणाऱ्या या 2 दिवसांच्या बैठकीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र कसे असेल याचबरोबर समन्वय समितीसंदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच I.N.D.I.A आघाडीच्या लोगोचं अनावरणही या बैठकीनंतर केलं जाईल किंवा त्यावर शिक्कामोर्बत होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बैठक केवळ I.N.D.I.A आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाची नसून या बैठकीमध्ये ठरणारी धोरणं आणि निर्णयांकडे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांचाही समावेश आहे. या बैठकीमध्ये अजेंड्यावर कोणकोणते विषय आहेत नेमके कोणकोणते निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे त्यावर एक नजर टाकूयात...
> I.N.D.I.A आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाण्याची शक्यता.
> मुंबईतील या बैठकीमध्ये I.N.D.I.A आघाडीचे संयोजक कोण असतील हे निश्चित केलं जाणार आहे.
> I.N.D.I.A च्या कॉर्डिनेशन कमिटीची स्थापना याच बैठकीत होईल. मात्र काहीजणांच्या मते ही कमिटी नंतर स्थापन केली जाईल. आताच ही कमिटी बनवणं घाईचं ठरेल असं मानणारा एक गट आहे.
> दिल्लीमधील मुख्य कार्यालयासंदर्भात I.N.D.I.A च्या या बैठकीमध्ये चर्चा होईल. अनेक पक्षांचा सामावेश असलेल्या या आघाडीचं मुख्य कार्यालय दिल्लीत असावं असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यावरही आझ निर्णय होईल.
> I.N.D.I.A चे प्रवक्ते कोण असतील याचीही चर्चा मुंबईतील बैठकीत होईल. प्रवक्ते निश्चित केल्यास या आघाडीच्या मतांमध्ये एक वाक्यता राखण्यास मदत होईल असं मानलं जात आहे.
> भविष्यात जनतेशीसंबंधित संयुक्त मोर्चे आणि आंदोलनांबद्दल चर्चा केली जाईल. या मोर्चा आणि आंदोलनांच्या माध्यमातून मतदारांना मतपेटीपर्यंत आणण्याचा या आघाडीचा मानस आहे.
> सत्ताधारी भाजपाविरुद्ध एकत्र आलेल्या I.N.D.I.A आघाडीमध्ये इतरही पक्षांना सहभागी करुन घेण्यासाठी चर्चा केली जाईल.
> आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी कशाप्रकारे वाटचाल करेल यावरही चर्चा होईल.
> जागावाटपाच्या मुद्द्यावरही मुंबईतील I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
या बैठकीसाठी 60 हून अधिक नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंबरोबरच सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल सहभागी होणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीरमधील नेते फारुख अब्दुल्ला, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. के. स्टॅलिन, मेहबुबा मुफ्ती, सिताराम येच्चूरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित राहणार आहेत.