गणेशोत्सवात मुंबईवर दहशतवाद्यांची नजर, सुरक्षेसाठी थेट 'जेम्स बाँड' मुंबईत हजर

गणेशोत्सवात मुंबईत घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांनी धमकी दिल्यानंतर आता भारताचे जेम्स बाँड आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मैदानात उतरले आहेत

Updated: Sep 4, 2022, 12:02 PM IST
गणेशोत्सवात मुंबईवर दहशतवाद्यांची नजर, सुरक्षेसाठी थेट 'जेम्स बाँड' मुंबईत हजर title=

झी २४ तास,  ब्युरो रिपोर्ट,  मुंबई: गणेशोत्सवात मुंबईत घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांनी धमकी दिल्यानंतर आता भारताचे जेम्स बाँड आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मैदानात उतरले आहेत. डोवाल यांनी मुंबई दौ-यात महत्तावाच्या बैठका घेतल्या आणि सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी नेमकं काय ठरलं? जाणून घेऊयात.

ऐन गणेशोत्सवात राज्यासह मुंबईत दहशतवादी हल्ला आणि घातपात घडवण्याच्या धमक्या येत आहेत. याची आता केंद्रानं गंभीर दखल घेतलीय. त्यामुळे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर भारताचे जेम्स बाँड समजले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेच आता दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

अजित डोवाल हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी थेट मुंबईत आले. आल्या आल्या त्यांनी बैठकांचा सपाटाच लावला. आधी ते राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

डोवाल केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर सुरक्षेचे बारकावे जाणून घेण्यासाठी थेट पोलीस मुख्यालयात गेले. त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला मुंबईच्या पोलीस आयुक्तांसह इतरही आयपीएस अधिकारीही उपस्थित होते. गुप्तचर खात्याचे अधिका-यांनाही या पाचारण करण्यात आलं होतं.

कोण आहेत अजित डोवाल? 

  • अजित डोवाल यांना भारताचे जेम्म बॉन्ड म्हणून ओळखले जातात
  • अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
  • अजित डोवाल हे 1968च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
  • सैन्याकडून देण्यात येणार-या किर्ती चक्राने गौरवण्यात आलेले पहिले पोलीस अधिकारी
  • 2005 साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाले.
  • उरीच्या सर्जिकल स्ट्राईकचे नियोजनात महत्वाचा वाटा आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाच सप्टेंबरला मुंबईच्या दौ-यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांचं माहेरघर असलेल्या पाकिस्तानातून मुंबईत घातपात घडवण्याच्या धमक्या येत आहेत. त्यातच रायगडच्या किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडली होती. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारताच्या जेम्स बाँडची करडी नजर मुंबईवर असणार आहे.

NSA of India Ajit doval in mumbai amid consistant terror threats