राष्ट्रवादीचा गटनेता अजित पवार का जयंत पाटील? संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

Updated: Nov 26, 2019, 11:03 AM IST
राष्ट्रवादीचा गटनेता अजित पवार का जयंत पाटील? संभ्रम कायम title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. सचिवालयात जयंत पाटील यांच्या नावाचं पत्र आलं आहे आणि ते स्पिकरकडे माहितीसाठी सादर करण्यात आलं आहे. स्पिकरनी याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गटनेता कोण याचा दावा विधानमंडळ करु शकत नाही, याबाबत स्पिकरच निर्णय घेतील, असं वक्तव्य महाराष्ट्र विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत म्हणाले आहेत.

विधीमंडळाच्या सचिवालयातील रेकॉर्डवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे, अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर आता विधीमंडळाकडून हे स्पष्टीकरण आलं आहे, त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला आहे.

पक्षाचा विधीमंडळ गटनेता हा व्हीप बजावत असतो. अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत आणि त्यांनाच व्हीप बजावण्याचा अधिकार आहे, असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते राहिलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नाही. त्यामुळे अजित पवार यांनी काढलेला व्हीप न पाळल्यास आपली आमदारकी रद्द होईल, ही भीती मनातून काढून टाका. तुमचे सदस्यत्व रद्द होणार नाही, याची जबाबदारी मी घेतो, असे सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आश्वस्त केले. ते सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, सभागृहाच्या नवीन सदस्यांमध्ये शंका आणि गैरसमज निर्माण केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार यांची निवड केली होती. त्यामुळे अजित पवार यांनाच व्हीप द्यायचा अधिकार आहे. व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, ज्या व्यक्तीला पक्षातील पदावरून दूर केले जाते त्या व्यक्तीला संबंधित पक्षासंदर्भात निर्णय घ्यायचा कोणताही अधिकार उरत नाही. आम्ही तज्ज्ञ आणि संसदीय कार्यपद्धतीच्या जाणकारांकडून याची खातरजमा करून घेतली आहे. त्यामुळे तुमची आमदारकी जाणार नाही, याची जबाबदारी मी घेतो, असे शरद पवार यांनी सांगितले.