राष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत

भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.

Updated: Nov 26, 2019, 10:16 AM IST
राष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत title=
संग्रहित छाया

मुंबई : भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे. राज्यपालांना खोटे पत्र दाखविण्यात आले आहे. भाजपकडे बहुमत आहे तर ते सिद्ध का करत नाहीत. चोरट्यासारखी शपथ घेतली आहे. अजून ते पुढे आलेले नाहीत. संविधानाची सर्वात मोठी हत्या करण्यात आली असून सत्ता अशा प्रकारे मिळवणार असेल तर समाजात अराजकता माजेल, अशी भिती व्यक्त करताना राष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी संविधान लिहिले आहे. त्या संविधानला जुमानले जात नाही. राज्यपालांकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. लोकशाहीची तिरडी उचली आहे. तुम्ही घटनेची हत्या केली. सत्यमेव जयतेची हत्या केली. आज संविधान दिन आहे. संसदेत चर्चाही होईल. बहुमत नसलेल्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जावी, असे घटनेत म्हटलंय का?, बहुमतापासून दूर का पळताय?, लपून छपून बहुमत सिद्ध करण्याची गरजच काय ? विरोधकांनी त्यांच्या संख्यांच्या दाव्याला उत्तर देणार नाही. आम्ही लेखी दिले आहे. त्यामुळे बहुमत तर सिद्ध होऊ द्या, असे सांगत संजय राऊत यांनी राज्यपालांनी पुन्हा राष्ट्रपती राजवट लावून दाखवावी. आतापर्यंत आम्ही शांत आहोत, असे स्पष्ट केले.

अजित पवार हे मोठे नेते आहेत. कालपरवापर्यंत आम्हाला काम कसे करायचे ते सांगत होते. त्यांच्याबद्दल काय बोलणार? शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे आहेत. दुसरा काय बोलतो, याला महत्व देण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये तसेच अस्मितेशी खेळू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.