मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिल सवलत, दूधदराबाबत निर्णय नाही

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वीज बिल सवलत आणि दूधदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

Updated: Aug 12, 2020, 11:11 PM IST
मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिल सवलत, दूधदराबाबत निर्णय नाही title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वीज बिल सवलत आणि दूधदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वीज बिल सवलतीचा प्रस्ताव आला नाही, तर केवळ चर्चा झाली. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचा प्रस्ताव येईल, लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

राज्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात मोठ्याप्रमाणावर वीज बिल आल्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. वाढीव वीज बिलात सवलत देण्याची मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केली. तर वीज बिलाविरोधात मनसेने महावितरणच्या ऑफिसची तोडफोड केली. 

वाढीव विज बिलामुळे नागरिकांमधला असंतोष बघता राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलाच्या सवलतीबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला नाही. 

दुसरीकडे दूधदराच्या मुद्द्यावरुनही भाजपने राज्यभरात आंदोलन केलं होतं. त्याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत काहीच निर्णय घेण्यात आला नाही.