रेमडेसिवीरमध्ये कमिशन मिळालं नाही हे खरं यांचं दु:ख; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप

आपल्या जावयाला अटक झाली म्हणून मलिक पिसाळलेल्यासारखे आरोप करत असल्याची बोचरी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली यावेळी केली.

Updated: Apr 20, 2021, 03:24 PM IST
रेमडेसिवीरमध्ये कमिशन मिळालं नाही हे खरं यांचं दु:ख; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप title=

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचं थैमान सुरू असताना राजकारण मात्र जोरात सुरू आहे. आज महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर रेमडेसिवीरचा तुटवडा केल्याचे गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांनाही भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी सणसणीत उत्तर दिले. आणि आरोप फेटाळून लावले. आपल्या जावयाला अटक झाली म्हणून मलिक पिसाळलेल्यासारखे आरोप करत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना, मुंबई बॉम्बस्फोटमधील जमिनी कोणी खरेदी केल्या, कोविड कमी झाला की लगेच ही प्रकरणे समोर आणू असा इशारा दरेकर यांनी दिला.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील रेमडेसिवीरचे वाटप केले. त्याची चौकशी केली का? दिलीप गायकवाड या बारामतीच्या कार्यकर्त्यांने पॅरॅसिटीमलचं पाणी औषध म्हणून वाटलं. त्याची चौकशी केली का? याचं आधी मलिकांनी उत्तर द्यावं असं दरेकर यांनी म्हटले आहे.

अमळनेरचे शिरिष चौधरी यांच्याबाबत मलिकांनी हवेत आरोप केले. त्यांनी ते निर्यात बंदीच्या आधी केले होते. तरीही काही चुकीचं केलं असेल तर कारवाई करावी, असे दरेकरांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारला कमिशन मिळाले नाही

राज्य सरकारच्या टेंडरला नीट प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही 900 ते 950 रुपयांना इंजेक्शन मिळणार असं सांगितलं होतं. याना 1600 ते 1650 पर्यंत इंजेक्शनची किंमत हवी होती. त्या फरकातून 700 ते 750 रुपयांचा फटका बसणार होता. त्यातून आता 40 ते 42 कोटीचं कमिशन मिळणार नाही हे खरं यांचं दु:ख आहे. असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.

हे सरकार पूर्णपणे भांभावेलं आहे. 4 तासांवर दुकाने आणली आहेत. त्यामुळे आणखी गर्दी होणार दिशाहीन निर्णयांमुळे ना दुकानदारांचा फायदा ना ग्राहकांचा फायदा होणार आहे. असंही दरेकरांनी म्हटलं आहे.