राज ठाकरे यांना नितेश राणेंचा पाठिंबा

 राज ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे पुढे सरसावले आहेत. या प्रकरणी त्यांनी एक ट्वीट केले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 29, 2017, 01:55 PM IST
राज ठाकरे यांना नितेश राणेंचा पाठिंबा title=

मुंबई : एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मनसे आक्रमक झाली आहे. पोलीस तसेच पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेला रस्त्यावर उतरावे लागत असल्याची मनसैनिकांची भावना आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे पुढे सरसावले आहेत. या प्रकरणी त्यांनी एक ट्वीट केले आहे.

एका मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना,”, असे म्हणत नितेश राणेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. 

शनिवारी संजय निरुपम यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर मनसैनिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. दरम्यान संजय निरुपम यांचे हातपाय तोडू अशी धमकी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली. आता या वादात नितेश राणेंनी उडी घेतल्याने वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

नितेश पुढे म्हणाले, मुंबई काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस उत्तर भारतीयांचा पक्ष बनत चालला आहे. काँग्रेसला मराठी माणसाची मते चालतात, पण मराठी माणूस चालत नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी संजय निरुपम यांच्यावर केली आहे. त्यामुळे नितेश राणे हे काय आक्रमक पाऊले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.