मद्यप्रेमींची पार्टी जोरात! 24, 25, 31 डिसेंबरला दारु दुकानं रात्री 'या' वेळेपर्यंत खुली राहाणार

New Year Party : नविन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.   

सागर कुलकर्णी | Updated: Dec 21, 2023, 08:25 PM IST
मद्यप्रेमींची पार्टी जोरात!  24, 25, 31 डिसेंबरला दारु दुकानं रात्री 'या' वेळेपर्यंत खुली राहाणार title=

New Year Party : 2024 वर्ष संपायला आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे, आणि नव्या वर्षाची म्हणजे 2024 ची चाहूल लागली आहे. मावळत्या वर्षाला निरोप (Year Ender) आणि नूतन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्टीचं (New Year Party) आयोजन करण्यात आलं आहे. रात्री उशीरापर्यंत या पार्टी सुरु असतात. यातच आता मद्यपींसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठी घोषणा केली आहे. यानुसार  24 , 25  आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकानं रात्री उशीरा एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  एरवी रात्री 11 वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास परवानगी असते.

नूतन वर्ष आणि ख्रिसमसच्या (Christmas) दिवशी मद्य विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत (liquor Shop Open Till 1 pm) सुरू राहणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान नूतन वर्षाचे स्वागत करताना होणारी मद्याची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्वतंत्र भरारी पथकं नियुक्त केली आहेत. शहरातील, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्वतंत्र चौक्या उभारल्या जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. जास्त मद्यविक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होऊन राज्याच्या तिजोरीतही भर पडते. त्यामुळे यंदा राज्य सरकाने 24 , 25  आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारू विक्रेत्यांनी रात्री उशीरापर्यंत दारु विकण्यासाठी परवानगी दिली आहे.

तर कारवाई होणार?
दरम्यान,  ड्रिंक अँड ड्राइव्ह नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाणार आहे. दारू पिऊन  वाहन चालवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळं, रेस्टोरंट्स, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळते. यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.