धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट...

 राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे. त्यात काही वेळापूर्वी नवा ट्विस्ट (New twist) आला आहे. 

Updated: Jan 14, 2021, 09:17 PM IST
धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट...  title=

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर संक्रात ओढावली. त्याची कारणे तुम्ही वृत्तवाहिन्यांवर मागच्या दोन दिवसांपासून बघताच आहात. धनंजय मुंडेवर थेट बलात्काराचे आरोप केलेत. इतकंच नाही तर स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पण त्याच महिलेच्या धाकट्या बहिणीने आता बलात्काराचा आरोप केल्याने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे. त्यात काही वेळापूर्वी नवा ट्विस्ट (New twist) आला आहे. 

भाजप नेत्याचा रेणू शर्मावर गंभीर आरोप  

भाजप नेते कृष्णा हेगडेंनी तक्रारदार रेणू शर्मावरच हनीट्रॅपचे (Honey Trap case) आरोप केलेत. त्यामळं हे प्रकरण अजून किती वळणं घेतंय हे बघावं लागेल. कोणत्याही सिनेमापेक्षा हा ड्रामा रंगत चाललाय. पण मुळात मुंडेंच्या घरात किंबहुना एक चांगलं घराणं समजल्या जाणाऱ्या मुंडेंच्या घरात असं का घडले आणि राजकारण या अशा गोष्टींमुळे बदनाम होण्यामागे जबाबदार कोण, याचीच चर्चा सुरु आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा नावाच्या महिलेनं बलात्काराचे गंभीर आरोप केलेत. त्यावरून मुंडेंना राजीनामा द्यावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दिवसभरात अशा काही नाट्यमय घडामोडी घडल्या की, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केल्यानं धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत. त्यात भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्यानं मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर धनंजय मुंडेंनी बुधवारीच पवारांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यापूर्वी त्यांनी फेसबूकवर या प्रकरणाचा खुलासा केला होता.

मुंडे यांनी काय केला खुलासा? 

यात त्यांनी 'माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे SMS रुपी पुरावे आहेत असा दावा केला. तसेच स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही त्यांनी जाहीर केले.
 
मात्र, खुद्द शरद पवार यांनीही हे गंभीर प्रकरण असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं पवारांनी सांगितले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत गेला. दरम्यान, धनंजय मुडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चाच झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.  

भाजप नेते हेडगे आणि मनसेचे मनीष धुरींची तक्रार

मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच, नियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी जनता दरबारही घेतला. या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असतानाच कहाणीत मोठा ट्विस्ट आला. रेणू शर्मा नावाच्या या महिलेनं ब्लॅकमेल केल्याचा तक्रारी अचानक पुढे आल्या. आणि ही तक्रार दुसंर तिसरं कुणी नव्हे तर भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीच केली. रेणू शर्मा हनी ट्रॅप लावून ब्लॅकमेल करते असा गौप्यस्फोट हेगडेंनी केला. त्यानंतर दुसरा गौप्यस्फोट मनसे पदाधिकाऱ्यानं केला. मनसेच्या मनीष धुरी यांनीही रेणू शर्मा अनेकांना फसवत असल्याचा दावा केला. त्यापाठोपाठ रिझवान कुरेशी नावाच्या एका जेट कर्मचाऱ्यानंही रेणू शर्मा ही हनी ट्रॅप रचून, ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला. 

रेणू शर्माविरोधात एकापाठोपाठ एक धक्कादायक गौप्यस्फोट होत असतानाच, शरद पवारांनी सह पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील यांना सिल्व्हर ओकवर बोलावून घेतले. त्यानंतर नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. या सगळ्या घडामोडींमुळं मुंडेंवरची संक्रांत टळली नसली तरी या प्रकरणातलं गांभीर्य कमी झालंय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.